माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे

8.9.08

नेटगुनिया


दचकलात, नाही ना? कारण मागे एकदा चिकुनगुनियाची साथ आली होती. तसला हा प्रकार नाहीये. हा एक वेगळा आणि आजच्या तरूण पिढीच्या जवळ असणारा प्रकार आहे. नेटगुनिया म्हणजे इंटरनेटवर जास्तीत जास्त वेळ घालविणे. आपण इंटरनेटवर काही कामानिमित्त वेळ घालवितो पण जर हा वेळ कामाव्यतिरिक्त असेल तर सावधान, आपल्याला ’नेटगुनिया’ झालेला आहे, असे आपण म्हणू शकतो. तुम्हाला माहितच आहे, आपण नेटवर कशासाठी बसतो ते, उत्तर येईल आपल्याला काही काम असते म्हणून. मग आपल्याला काम ते कोणते असते? (मला पोस्ट टाकायच्या असतात, म्हणून मी नेटवर बसते) सर्वांचे उत्तर वेगळे येईल, नाही का? आपण जर एक दिवस इंटरनेटवर बसलो नाही तर आपल्याला कसेतरीच होते का, दररोज ई-मेल चेक करण्याशिवाय चैन पडत नाही, आपण आपला इनबॉक्स सतत चेक करत असतो, ई-मेल पाठवणे जरूरीचेच असते, आलेल्या ई-मेलला उत्तर देण्यावाचून पर्याय नसतोच मुळी ह्या प्रश्नांची उत्तरे जर ’हो’ असतील तर मग आपल्याला नेटगुनिया झालेला आहे, असे आपण म्हणू शकतो. म्हणजेच आपण माहितीच्या या महाजालाच्या आधीन झालेलो आहो आणि आपण याचे गुलाम आहोत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण कोणत्याही नवीन तंत्राचे एका बाजूने फ़ायदेच फ़ायदे असतात तर दुसरीकडे मात्र तोटा असतो. कारण आपण त्याच्या जास्त जवळ गेलो तर आपल्याला वाटते आपण जगाच्या फ़ारच जवळ गेलो आहे. आपल्याला खूप माहिती मिळते, परंतु ज्ञान मात्र काहीच नाही. आपण जर हे मानले की आपल्याला नोकरीच्या नवनवीन संधी प्राप्त होतात, खूप काही नवीन शिकायला मिळते परंतु आपण आपल्या घरापासून दुरावतो, आपल्या माणसांशी कमी संवाद साधतो ही साधी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. मी म्हणत नाही, नेटवर बसू नका. उलट ते फ़ार गरजेचे आहे. परंतु त्याची एक वेळ निश्चित करा जेणेकरून आपण त्याच वेळेत आपले काम करू शकू. जर आपण हे करू शकलो तर मला वाटेल आपण ’नेटगुनिया’ चा नायनाट करू शकतो. कारण तो एक प्रकारचा आजारच आहे. माझ्या मते, ’ब्लॉग’ हे आपल्या माणसांशी संवाद साधण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. परंतु खुप कमी जण ब्लॉग बनवतात (मराठीब्लॉग्ज मध्ये आपल्या हे लक्शात येईलच) व आपले विचार आपल्या माणसांपर्यंत (मला म्हणायचे आहे मराठी माणसापर्यंत) पोहचवतात (माझ्याप्रमाणे). काही जणांना तर ब्लॉग ही काय भानगड (?) आहे असे वाटेल. कारण ते आपला वेळ ई-मेल तसेच आपल्या अकाऊंट मध्येच घालवतात. त्यांना याबाबत फ़ारच कमी माहिती असते. अशा व्यक्तींना ब्लॉग कसा बनवावा याची माहिती देणे हे प्रत्येक ब्लॉगरचे कर्तव्यच आहे (हो?) परंतु ब्लॉग वर पण केव्हा, किती वेळ काम करावे, याची सुध्दा एक वेळ निश्चित करायलाच हवी, असे मला वाटते. नेटगुनिया टाळण्यासाठी काय करायला हवे? तुम्हाला जर असे वाटते की, तुम्ही नेटगुनियाच्या आधीन झालेले आहात तर हा एक गंभीर प्रश्न आहे. ते एक प्रकारचे व्यसनच आहे. यासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे आपली इंटरनॆटची एक निश्चित वेळ ठरवा. त्या वेळेत आपण आपली कामे उरकून घ्या. म्हणजेच दररोज पाच - सहा तास वाया घालविण्यापेक्शा जास्तीत जास्त दोन तासच बसा. एक महत्वाची गोष्ट म्हणजे चॅटींग सुध्दा कमीत कमी वेळ करा. काही जणांना सवय असते की ते वेड्यासारखे चॅटींग करत असतात. त्याला काही अर्थ असेल तर ते नक्की करा. पण काही तरी वेळ घालवायचा म्हणून चॅटींग करायची हे मूर्खपणाचे लक्शन आहे. तसेच आपल्या आरोग्यावरसुध्दा परिणाम होऊ देऊ नका. जास्तीत जास्त वेळ इंटरनेटवर बसण्याने डोळे चुरचुरणे, डोके दुखणे अशा तक्रारी उद्भवू शकतात. यासाठी आपल्या आरोग्याकडे लक्श देणेही जरूरीचे आहे. नेटगुनिया टाळण्यासाठी आपण एखादा ब्लॉग बनवून आपल्या मनाचे विचार, आपल्या भावना जर प्रकट करू शकलो तर खूप चांगले होईल. त्यामुळे आपण अनेक जणांच्या संपर्कात तर राहूच, त्याशिवाय आपली माणसे आपल्या गुणांची कदर कशी करतात, ते सुध्दा अनुभवू शकतात. आपण जर योग्य वेळी, समतोल साधत नेटवर बसलो तर ’नेटगुनिया’ आपल्या चार हात दूर तर राहीलच शिवाय ’इंटरनेट’ हा आपला एक जीवाभावाचा मित्रच होईल नाही का?

No comments: