माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे

9.9.08

एवढी धावपळ कशासाठी?

पुण्याला एका सॉफ़्टवेयर इंजिनीयर असलेल्या तरूणाने आत्महत्या केली. वाचली ही बातमी आपण? काय वाटले वाचून? त्या मुलाला का करावीशी वाटली आत्महत्या? त्याने त्याच्या घरच्यांच्या विचार केला नसेल का? हे अनेक प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही मंडळी. पण त्याचे एक कारण हेही असू शकेल ते म्हणजे आजची बदलती परिस्थिती, जास्त पैशांचा हव्यास.



आजचे युग हे जीवघेण्या स्पर्धेचे आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जो तो ऊर फ़ुटेस्तोवर काम करतो आणि करतच राहतो. कारण स्पर्धा ही काही थांबत नाही. पण ही स्पर्धा आपण कशासाठी करत असतो हे ठाऊक आहे का आपल्याला? ती करून जर आपल्याला मानसिक समाधान व मनाची शांती मिळत नसेल तर तिचा उपयोग तो काय? चांगले उच्च शिक्षण घेऊन नोकरी करायची आणि नोकरी टिकवता येत नाही म्हणून आत्महत्या करायची या गोष्टीला काही अर्थच नाही. कारण आपले जीवन हेच फ़ार अनमोल आहे. देवाने दिलेल्या या सुंदर देणगीला अव्हेरणे हा मोठा अपराध आहे. जीवनासारखं सुंदर काहीच नाही आणि जीवन नाही तर काहीच नाही हेसुध्दा आपल्या लक्षात येत नाही.



नोकरी करतांनाही जी गोष्ट आपल्याला येत नाही तिच्यासाठी स्पष्ट शब्दात "नाही" म्हणायला शिकले पाहिजे. उगाच जी गोष्ट येत नाही तिच्यामागे धावायच ते कशासाठी? तसचं एक प्रमोशन कमी मिळाले तर काही आभाळ फ़ाटणार नाही. दुसरे जातात तर जाऊ द्यायचं त्यांना. आपल्या क्षमता आपण ऒळखून कामाला लागायला हवं. मग बघा यश हे तुमचच आहे. आपल्याला जी काही गोष्ट करावीशी वाटत असेल ती आजच आणि आताच करा. तुम्हाला एखाद्याला आपल्या मनातील काही सांगायच आहे, मग ते आताच सांगा. उद्या सांगू, परवा सांगू करता करता तो दिवस येणारच नाही. काही खावसं वाटत मग ते आताच खा. आपल्याकडे भरपुर पैसे आले की मगच जीवन जगू ही गोष्ट मुर्खपणाची आहे. तसेच नुसतेच पैसे कमवून करायच काय आहे तुम्हाला? खुप पैसा कमवून जर मनाची संतुष्टी गमावून बसलात तर कायमचीच गमावून बसाल.



सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्यासाठी तुम्ही हा पैसा कमावणार आहात ती तुमची जिवलग नातीच जर तुमच्याजवळ नसेल तर त्या पैशाला काहीही अर्थ राहणार नाही. मग तुम्ही फ़क्त आणि फ़क्त पळतच राहणार आणि जीवनाच्या शेवटी मात्र तुमच्या हातात काहीही शिल्लक राहणार नाही.

सांगण्याचे तात्पर्य हेच की, तुम्ही फ़क्त पैशाच्याच मागे धाऊ नका. तर मनाला आवडेल अशा खूप काही गोष्टी कराव्याशा वाटल्या तर नक्की करा.

याबाबतीत एक गोष्ट इथे सांगावीशी वाटतात, एक कुंभार असतो. तो मस्त आराम करत बसलेला असतो . त्याच्याजवळ एक शहरातील माणूस येतो. तो त्याला म्हणतो, अरे असा झोपत राहशील तर तुझे कामच राहून जाईल की!
कुंभार : मग त्याने काय होईल?
माणूस : तुला भरपुर पैसे मिळतील. तु चांगलं घर, गाडी घेऊ शकशील आणि मग बघं तुला किती छान झोपं लागते ते!
कुंभार : मग मी आता काय करत आहे?

ही गोष्ट सांगण्यामागे एकच हेतु, तो म्हणजे आपली कामे करत असतांना आपले ध्येय मात्र विसरू नये आणि त्या ध्येयाला गाठण्यासाठी प्रयत्न करावेत. नाहीतर आपलीही गत गोष्टीतल्या कुंभारासारखीच होईल.

No comments: