माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे

11.9.08

"इको फ़्रेन्डली" गणपती





इको फ़्रेन्डली हा शब्द तुम्ही सर्वांनी ऎकला असेलच. पण काहींना त्याचा अर्थ माहित नसतो किंवा ती काय भानगड आहे हेही माहित नसते. या शब्दातील ’इको’ म्हणजे पर्यावरण तर ’फ़्रेन्डली’ म्हणजे स्नेही. इको फ़्रेन्डली म्हणजे पर्यावरण स्नेही. परंतु या शब्दाचा आणि गणपतीचा संबंध तरी काय असणार हा प्रश्न मनात आल्यावाचून राहणार नाही. हो, हो मी पण तेच सांगणार आहे. गणपतीबाप्पांचा आणि पर्यावरणाचा खूप मोठा संबंध आहे.

गणपतीच्या मूर्ती ह्या कशाच्या बनवलेल्या असतात माहित आहे, प्लॅस्टर ऑफ़ पॅरीसच्या तसेच अनेक रासायनिक रंगांनी त्या रंगवल्या जातात. आणि मग आपण काय करतो, त्या गणपतीला बसवतो आणि प्रथेप्रमाणे शेवटच्या म्हणजेच विसर्जनाच्या दिवशी त्यांना नदीच्या पाण्यामध्ये विसर्जित करतो. त्याने काय होते? तर त्याने नदीचे पाणी प्रदुषित होऊन त्यात ते रासायनिक रंग मिसळले जाऊन पाणी पिण्यायोग्य राहणार नाही. मग गणपती बाप्पा अशाने आपल्यावर फ़ार प्रसन्न होतील नाही का? गणेश मंडळांमध्ये तर स्पर्धाच लागतात कोणाची मूर्ती सर्वात मोठी. परंतु त्यांच्या हे लक्षात येत नाही की, जेवढी मूर्ती मोठी तेवढे प्रदुषण जास्त. विसर्जनाच्या दिवशीही मोठी मूर्ती पाण्यात व्यवस्थित बुडवली गेली नाही की तिची विटंबणा होईल. मग हे सगळे करून फ़ायदाच काय?



परंतु आता यावर करणार तरी काय? आपल्या प्रथा, आपले उत्सव आपण साजरे करणार नाही तर कोण करेल? अहो किती हे प्रश्न? आपणच साजरे करूया पण जरा वेगळ्या पध्दतीने. वेगळी पध्दत म्हणजे इको फ़्रेन्डली म्हणजेच ’गणपतीबाप्पा मोरया’ म्हणत त्याला पर्यावरणाच्या जास्त जवळ नेऊन. पण त्यासाठी करायच ते काय? तर त्यासाठी गणपती मंडळांनी मोठ्या मूर्तींचा अट्टाहास न धरता जास्तीत जास्त श्रध्दा ठेवून लहान मूर्ती बसवाव्यात. तसेच सजावटीसाठीही जास्त प्लॅस्टीकचा व थर्माकॉलचा वापर न करता पाने, फ़ुले यासारख्या नैसर्गिक संपत्तीचा वापर करावा. जेणेकरून ते रोज बदलवता येऊन त्यांचा खतासाठीही चांगला उपयोग करता येऊ शकेल. त्याचप्रमाणे विसर्जनाच्या दिवशी लहानशा तलावात त्या मूर्तींचे विसर्जन करता येऊ शकते.
तसेच घरात गणपती बसवतांना शाडूच्या मातीची घरच्या घरी बनवलेली मूर्ती बसवावी आणि शेवट्च्या दिवशी घराजवळच्या बागेत किंवा लहानशा बादलीत तिचे विसर्जन करावे. त्याचप्रमाणे शांततेत आणि गोंगाट न करता गणेशोत्सव जर साजरा करण्यात आला तर खऱ्या अर्थाने आपण पर्यावरण स्नेही हॊऊ. कारण गणपतीला फ़क्त गोंगाटच नको तर हवी फ़क्त मनापासून आणि श्रध्देने त्याची सेवा करण्याची तयारी. मग बघा गणपती बाप्पाही हे सगळे बघून फ़ारच खूश होतील.

No comments: