माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे

13.9.08

मुलाखतीला जाताना

मुलाखतीचे निमंत्रण हे तुमच्या भावी यशाची नांदी असते. विशिष्ट नोकरीसाठी लागणारी किमान पात्रता तुमच्याजवळ आहे याची ती पावती असते. तुम्हाला मुलाखतीला बोलावून तुमचा भावी मालक तुम्ही अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे काही गोष्टींचा सोक्षमोक्ष करून घेत असतो.

सामान्यत: मुलाखतीचे पत्र कमीत कमी एक आठवडा अगोदर येते. आपणास तयारीस पुरेसा वेळ मिळतो. ग्रामीण भागात पत्रे वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे मग ऎनवेळी पत्र मिळाले तरी ’कपडे चांगले नाहीत’ असे म्हणून चालत नाही. तर आपण जे कपडे नेहमी वापरतो तेच वापरावेत. परंतु ते नीट्नेट्के, स्वच्छ व धुतलेले असावेत. शक्यतो त्याला इस्तरी केलेली असावी. त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वात निश्चित फ़रक पडतो. अगदीच भडक, फ़ॅशनेबल कपडे घालू नयेत. आपण कोणत्या पदासाठी मुलाखतीस जात आहोत याचेही भान असायला हवे. भारी किंमतीचा पोशाख मुलाखतीसाठी प्रथमच वापरू नये. मुलींनी नवीकोरी साडीऎवजी नेहमीची पण स्वच्छ साडी किंवा पंजाबी ड्रेस घालावा.

शासकीय किंवा खाजगी नोकरीत काही अपेक्षित शैक्षणिक पात्रता गृहीत धरलेली असते. त्यामुळे त्यांची तोंडी मुलाखत घेण्यात येते जेणेकरून उमेदवाराची बोलण्याची, वागण्याची पध्दती, विषयाची माहिती, चालू घडामोडींचे ज्ञान, नवीन शिकण्याची आवड तपासण्यात येते. मुलाखतीत याला अनुसरून प्रश्न विचारण्यात येतात.

मुलाखतीसाठी प्रवेश करतांना प्रथम शुभचिंतन केले पाहिजे. मुलाखतीत सर्व प्रथम सोपे प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न विचारुन तुमच्या मनातील ताण कमी व्हावा हाच उद्देश परिक्षकांचा असतो. आपल्या नैमित्तिक सवयी उदा. तोंडावर हात ठेऊन प्रश्नांची अस्पष्ट उत्तरे देणे, पाय हलविणे, मान डोलावणे, टेबलावर हात ठेवणे, या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत.

प्रश्नांची उत्तरे देतांना भरभर बोलू नये. परिक्षक प्रश्न विचारत असतांना उतावळेपणाने त्याचे उत्तर देऊ नये. प्रश्नांची अचुक व खरी उत्तरे द्यावीत. कारण त्यावरूनच तुमच्या व्यक्तिमत्वाची ऒळख होते. बऱ्याच प्रसंगात उमेदवाराला त्याच्या कौटुंबिक परिस्थितीची माहिती विचारण्यात येते. अशा वेळी त्याने खरी माहिती सांगणे आवश्यक आहे. साधी देखील माहिती सांगता आली नाही तर उमेदवाराने चेहऱ्यावर नाराजीची किंवा चुकलेपणाची भावना न दाखवता नम्रपणे "माहिती नाही" असे सांगावे. विनाकारण डोक्याला हात लावून विचार करत बसू नये.

मुलाखतीत विचारात घेतल्या जाणाऱ्या गोष्टी -
१. व्यक्तिमत्व - तुमचा पोशाख, वागण्याची पध्दत, आवाज, बोलण्याची पध्दत व वेग, मनोधैर्य, आत्मविश्वास

२. कौटुंबिक पार्श्वभूमी - तुमचे वडील, काका, मामा इ. च्या नोकऱ्या व त्यातील स्थान, त्यांचे समाजातील वजन, संदर्भ असलेल्या व्यक्ती

३. शिक्षण - शाळा, कॉलेज, त्यातील गुण, टक्केवारी, शिक्षण घेत असतांना खेळ, नाटके व अन्य उपक्रमातील सहभाग, यश व जबाबदाऱ्या

४. शिक्षणोत्तर अभ्यास - नोकरी व अनुभव इ. बाबत माहिती

५. आवडिनिवडी - वाचन, संगीत, चित्रकला, प्रवास, नृत्य, समाजकार्य, लेखन इ.

६. सामान्यज्ञान - यात तुमच्या व्यक्तिमत्व गुणाची पारख केली जाते. त्यात नेतृत्व, निर्णय घेण्याची क्षमता, सेवाभाव, कल्पकता, शिस्तप्रेम, तत्परता, प्रामाणिकपणा इत्यादी गोष्टी समाविष्ट होतात.

No comments: