माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे

10.10.08

मनामध्ये

केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये,
आपुलकीच्या नात्यांमधुनी स्नेह जपावा मनामध्ये ॥१॥

येणाऱ्याला पाणी द्यावे, मुखांत वाणी गोड हवी,
जाणाऱ्याच्या मनांत फिरूनी येण्याविषयी ओढ हवी. ॥२॥

ऐसा प्रेमळ माणुसकीचा झरा वहावा मनामध्ये,
भांड्याला लागते भांडे, विसरूनी जांवे क्षणांमध्ये. ॥३॥

परस्परांना समजुनी घ्यावे, अढी नसावी मनामध्ये,
रुसवे-फुगवे नको फुकाचे, मोद रहावा घरामध्ये. ॥४॥

नित्य काळजी घरात घ्यावी-वय झालेल्या पानांची,
ज्याला त्याला द्यावी जागा, वया प्रमाणे मानाची. ॥५॥

एकमताने निर्णय घ्यावा- नको दुरावा मनामध्ये,
एक तीळ ही सात जणांनी वाटून घ्यावा घरामध्ये ॥६॥

नको घराला गर्व धनाचा- लिन रहावे प्रभुचरणी,
लळा जिव्हाळा आंत असावा नको उमाळा वरकरणी. ॥७॥

दिवसा रात्री परमेशाचा वास असावा घरामध्ये,
आपुलकीच्या नात्यांमधुनी स्नेह जपावा मना मध्ये ॥८॥

कवयत्री : विमल लिमये.

No comments: