माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे

7.10.08

हरवलेलं राष्ट्रप्रेम

देशदूत पेपरातील "हरवलेलं राष्ट्रप्रेम" हा लेख मी वाचायला घेतला आणि मला तो इतका आवडला की मी त्याला माझ्या ब्लॉगवर समाविष्ट करण्याचे निश्चित केले. त्याची लिंक माझ्याकडे नसल्याने तो लेख मी जसाच्या तसा सर्वांसाठी सादर करत आहे. कारण अशा विचारांची देशाला फ़ारच गरज निर्माण झालेली आहे.

शिक्षण घेतांना नेहमी ऎकिवात यायचं, ’देशासाठी जगायला पाहिजे’ मात्र असं जीवन जगणारे फ़ारच थोडे. आणि तेही ऎकलेले किंवा वाचलेले. एवढी निस्सीम राष्ट्रनिष्ठा या धावपळीच्या युगात प्रत्यक्ष बघायला वा अनुभवायला मिळाली नाही. प्रत्येकाला वाटतं शहीद भगतसिंग जन्माला यावेत पण आअपल्या घरात नाही शेजारच्या घरात. चंगळवाद, वाढती स्पर्धा, पैसा हे अंतिम साध्य, भपकेबाज प्रगती यात आपण गुरफ़टत चाललोय. सर्वांचेच असे ध्येय असतील तर देशासाठी विचार करणार कोण?

अशा प्रकारे मी विचार करू लागलो याला कारणीभूत ठरली एक व्यक्ती. ’अनिवासी भारतीय’ एखाद्या अनिवासी भारतीयाने (एनआरआय) एका अस्सल भारतीय (ह.मु.भारत, खंड - आशिया) माणसाच्या मनात राष्ट्रभावना जागृत केली. या व्यक्तीने दीड तास जे भाषण दिले त्यात ते भावना अनावर होत रडू लागले. रडत असतांना ते एक वाक्य बोलले व सभागृहातल्या ताठ माना शरमेने खाली झाल्या. ते म्हटले, मला माझ्या भारताची काळजी वाटते. ती व्यक्ती सुप्रसिध्द हॉटेल व्यावसायिक श्री. बाळासाहेब देशमुख (जपान).

बाळासाहेब देशमुख (मूळ उस्मानाबाद जिल्हा) सन १९७१ मध्ये अगदी कफ़ल्लक विचाराने जगत असतांना ’जपान देश कसा असेल?’ या कुतुहलापोटी जपान जायचे स्वप्न बघतात. हातात ना मोठी पदवी नाही पैसा. अशा परिस्थितीत ते स्वप्न बघतात व साकार करतात. प्रारंभी जपान जाण्यासाठी कष्ट, जपानमध्ये भांडी धुणे, फ़ुलं विकणे, शौचालय साफ़ करणे, उपाशी राहणे, धर्मांतराची प्रलोभने दाखवणे अशा अनेक्विध दिव्य पार पाडून यशस्वी उद्योजक बनणे हा प्रवास थक्क करतो. याला कारण ’ते ज्या लोकांमध्ये राहिलेत ती जापानी वृत्ती’ जापान....हिरोशिमा, नागासाकी...जागतिक महायुध्दात बेचिराख झालेला देश. १९४५ साली जापान नेस्तनाबुत झाला. एक नवीन पर्व १९४५ नंतर जापानमध्ये सुरू झाले. प्रत्येक जापानी फ़क्त देशासाठी जगू लागला. सर्वांचे एकच ध्येय ’जापान महासत्ता होणार’ एक स्वप्न आणि करोडो हात आणि फ़क्त राष्ट्रप्रेम याचा परिणाम जापान काही दशकात एक विकसित राष्ट्र म्हणून नावारूपाला आला.

सोबत १५ ऑगस्ट १९४७ भारत स्वतंत्र झाला. भारतातही एक नवं पर्व सुरू झालं. जवाहरलालजी, गांधीजी, तत्कालीन मोठ्या विभुतींनी भारतीयांना जगण्याचे मंत्र दिले. कर्मपुजा, सामाजिक समानता, सर्वात मोठी लोकशाही, भारतीय संविधान तत्सम महान तत्व भारतीय मातीत रूजत होती. समाजसुधारणा, स्त्रीशिक्षण, अनिष्ठ प्रथाबंदी वाटचाल सुरू झाली. विज्ञान-तंत्रज्ञान-संरक्षण, अवकाश विज्ञान क्षेत्रात भारत पुढे जात होता. तरीही आज भारत विकसनशिल राष्ट्र का? १०० करोडहून मोठ्या लोकसंख्येचा देश असुनही विकसनशिल का? मात्र जापान....काळोखातलं राष्ट्र...विकसित का? या सर्वांना कारण निस्सीम राष्ट्रभक्ती! जापानी माणसाला कुठल्याही कामाची शरम नाही. कामाला वेळेचं बंधन नाही. ना चालीरिती, ना परंपरा, नाही कर्मकांड, नाही अंधश्रध्दा. एकच तत्व ’कर्म म्हणजे मंदिर, माणुस म्हणजे देव’. जापानी दाम्पत्य वडील स्वर्गवासी झाल्यानंतर नोकरीच्या ठिकाणी ’ऒव्हरटाईम’ करतात. कारण तीच वडीलांना श्रध्दांजली असते. मात्र कर्माशी तडजोड नाही. यामुळेच जापानने राखेतुन फ़िनिक्स भरारी घेतली. समकालीन उदय झालेल्या तुमच्या आमच्या भारताचे काय? तर विलासी वृत्ती, स्वार्थी दृष्टीकोण. आजही भारतात चतुर्थ श्रेणी कर्मचारी होण्याची लाज वाटते. शासकीय कार्यालयातला सावळा गोंधळ, तर उद्योगधंद्यात कर्मचाऱ्यांची अकुशलता, कामचुकार वृत्ती. सामान्य माणसांच आयुष्य भोगवस्तु मिळविण्यात संपतं. तर श्रीमंतांचं आयुष्य वस्तुंचा भोग घेण्यात संपणार असतं.

वयाच्या २८ ते ३० वर्षांपर्यंत तरूणांना आई वडील खाऊ घालतात व त्यातचं समाधान मानतात. म्हणे भारत तरूणांचा देश आहे. ते तरूण जे स्वार्थी, लोभी राजकारण्य़ांच्या प्रचारफ़ेरीत निरर्थक ऒरडतात, तेच दर शुक्रवारी कोणती फ़िल्म रिलीज होणार याची वाट पाहतात. तरूणांच्या शक्तीचा वापर अशा रितीने होणार असेल तर कोणत्या तंत्रज्ञानाच्या बळावर भारत महासत्ता होणार? आज माता भगिनींना प्रत्येक चौकात वाईट नजरांना समोर जाव लागतं. किशॊरवयीन मुलींना आत्महत्या कराव्या लागतात व नाजुक हातपाय निरागस चेहऱ्याच्या बालकांना मजुर बनावं लागतं. अशा असंख्य समस्यांनाच आता विचारावसं वाटतं असं का?

जापान वय वर्ष ६३, भारत वय वर्ष ६१, यात साम्य. मात्र प्रगतीत एवढा फ़रक कशासाठी तर खालील बाबी भारतीय तरूणाईत रूजवाव्यात. एवढचं...विधायक राजकारणाला पाठींबा द्या. स्वत:ची शक्ती सत्कर्मासाठी खर्च करूया. पोस्टरछाप पुढाऱ्यांना वेळीच ऒळखू या. चांगल्या कामाची लाज बाळगू नका. अंधश्रध्दा, कर्मकांड, अनिष्ट प्रथा मुळासकट नाहीशा करू या. व्यसनांपासून दूर राहू या. "माझ्यासाठी देश नाही तर देशासाठी मी" यशासाठी अविरत झुंजत राहा. बॉलीवुड, टिव्ही, सिनेतारका यांपासून उत्तम गुण घ्या. भारतीय समाजाला बाधक गोष्टी वर्ज्य करा. राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा, राष्ट्राभिमान उराशी बाळगा. प्रांतवाद, धर्मवाद, भाषावाद मनातुन, देशातुन हद्दपार करा. हे जर तरूणांनी केले तर निश्चितच सर्वांनी पाहिलेले स्वप्न लवकर पूर्ण होईल.

No comments: